अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात ट्रक-दुचाकी-टेम्पोचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर पाठीमागे बसलेला एक व टेम्पोतील एक, असे दोघे जखमी झाले.
विशाल बाबासाहेब कारभार (वय १७, रा. भालगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), असे मृताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात चालकाचा ताबा सुटल्याने पुढे चालेल्या दुचाकीला ट्रकची धडक बसली.
या अपघातात दुचाकीस्वाराला चिरडून ट्रकने पुढे जाणाऱ्या टेम्पोला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार विशाल कारभार याचा मृत्यू झाला.
दुचाकीवर पाठीमागे बसलेला शंकर वसंत पवार हा किरकोळ जखमी झाला, तसेच टेम्पोतील दत्तात्रय पंढरीनाथ नवथर (वय ३०, रा. शहालीपिंप्री, ता. नेवासा) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर नेवासा फाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान ट्रक चालकास नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता मृताच्या संतप्त नातेवाइकांनी त्याला मारहाण केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे व पोलीस हवालदार सुहास गायकवाड यांनी प्रसंगावधान राखत परिस्थितीवर नियंत्रण मिळवीत वातावरण शांत केले.