अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- शहर पोलिसांनी दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून ५० हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
या धडाकेबाज कामगिरीचे नागरिकांतून कौतुक होत असून, यापुढेही कारवाईचा सिलसिला चालूच ठेवून दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,
पोलीस नाईक ए. एम.दारकुंडे, पोलीस शिपाई जी.एस.मैड व बी.बी.धोंगडे हे कोकमठाण परिसरातील तीनचारी येथे गस्तीवर असताना किरण दिलीप बेंडकुळे हा संशयास्पदरित्या दिसून आला.
त्याची अधिक विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातील प्लॅटिना दुचाकी (क्र. एम एच.१७, सीजी.२६२२) ही धारणगाव शिवारातील सोनार वस्ती येथून चोरली असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यास पोलीस ठाण्यात आणले असता
या दुचाकीबाबत तालुका पोलिसांत गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. त्याची कसून चौकशी केली असता गणेश उत्तम पवार (वय-२३, कोळगाव मळा, ता.सिन्नर, जि.नाशिक), रोहित बाबासाहेब मोकळ (वय-२०, रा.कोळगाव मळा, ता.सिन्नर, जि. नाशिक)
अशी साथीदारांची नावे सांगून त्यांनी श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल (कोकमठाण) येथून १ मार्च व २९ मे, २०२१ रोजी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्र. एमएच.१७, एआर.९९०), बजाज कंपनीची
प्लॅटिना दुचाकी (क्र. एमएच.१७, सीजी.२६२२) आणि होंडा कंपनीची ड्रीम युगा दुचाकी (क्र. एमएच.१७, एडब्ल्यू.४९९७) अशा एकूण ५० हजार रुपये किंमतीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
पुढील तपास शहराचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे हे करत आहे. तर नागरिकांनी या धडक कारवाईचे कौतुक केले असून, यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्याची मागणी केली आहे.