अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज 61 वा वाढदिवस आहे. कोरोना पार्श्वभूमी आणि राज्यातील पूरस्थितीमुळे वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘उद्धव ठाकरे यांची क्षमता देशाचं नेतृत्व करण्याची आहे. तो दिवस लवकरच येईल,’ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या ट्वीटची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली तसंच इतर जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. शरद पवार यांनी पुरात नुकसान झालेल्यांसाठी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून मदत जाहीर केली.
राज्यातील महापुराच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेला संबोधित करणाऱ्या शरद पवार यांना राऊत यांच्या वक्तव्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर पवारांनी सकारात्मक उत्तर दिलं.
‘महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्यासाठी पुढं येत असेल आणि त्या व्यक्तीला लोकांचा पाठिंबा मिळत असेल तर आम्हाला आनंदच आहे,’ असं पवार म्हणाले.महाराष्ट्रातील नेता देशाचं नेतृत्व करत असेल तर आम्हाला आनंदच आहे, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे.
पहा व्हिडीओ : शरद पवार यांची पत्रकार परिषद
दरम्यान, राऊत यांनी सकाळीच मीडियाशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो, असं प्रत्येकाला वाटतं.
हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असं ते म्हणाले.
दरम्यान शरद पवार यांनी यावेळी नेत्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करु नये असं आवाहन केलं. “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तिथे गेलंच पाहिजे. नेमकी वस्तूस्थिती काय आहे याचा आढावा त्यांनी घेतलाच पाहिजे.
पण इतरांनी जाऊ नये. मी गेलो तर यंत्रणेतील लोक माझ्याभोवती जमा होतील. यामुळे ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यावरुन लक्ष विचलित होईल,” असं शरद पवार म्हणाले आहेत.