अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कलम १४४ अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहे. यामध्ये पोलीस महत्वपूर्ण भूमिका निभावण्यासाठी थेट रस्त्यावर उभे आहेत.
पोलीस व्यस्त असलेल्या संधीचा फायदा घेऊन शनिवारी (ता.१७) रात्री ९ वाजेच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी ६० किलोची बेहिशोबी चांदी घेऊन जात असताना कोपरगाव शहर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान हस्तगत केली आहे.
कोविड संकटाचा मुकाबला करण्यासाठी दिवस-रात्र कर्तव्य निभावत असतानाही गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवल्याने पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,
जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केलेल्या आदेशानुसार कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कलम १४४ नुसार कडक अंमलबजावणी करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पोलिसांवर आहे. यानुसार शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आहे.
याच दरम्यान शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील राजगुरूनगर हुपरी येथील सौरभ अनिल पाटील (वय २६ ) हा व्यापारी सियाज कारमधून (क्र.एमएच.१८, एजे.९०२०) येवला-कोपरगाव मार्गे शिर्डीकडे जात होता.
त्यावेळी साई कॉर्नर येथे नाकाबंदीसाठी तैनात असलेले पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, चालक तथा सहाय्यक फौजदार साठे, पोलीस शिपाई खारतोडे, नवाळी, गृहरक्षक दलाचे जवान अमोल थोरात,
विशाल कोळपे आदिंनी गाडीची काच उघडी ठेवून आणि तोंडाला मास्क लावलेला नसल्याने दंडात्मक कारवाईसाठी गाडी थांबविली. मात्र, त्याने मी हार्डवेअर दुकानदार असून गाडीमध्ये काहीही नसल्याचे सांगितले.
परंतु, पोलीस निरीक्षक देसले यांचा संशय बळावल्याने त्यांनी गाडीची झडती घेण्यास सहकाऱ्यांना सांगितले. त्यावेळी झडती घेतली असता गाडीच्या पाठीमागील बाकाला चैन दिसली. अधिक तपासणी केली असता एका गोणीमध्ये चांदीसदृश्य ठोकले दिसले.
याची खातरजमा करण्यासाठी विचारल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर कोणतेही खरेदीचे कागदपत्रे मिळून न आल्याने पोलिसांनी गुरनं.१२०/२०२१ मपोका.१२४, भादंवि.१८८ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत ५ लाख रुपयांची कार आणि ३० लाख रुपये किंमतीची चांदी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,
अप्पर पोलीस अधिक्षिका डॉ.दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचे पोलीस निरीक्षक देसले यांच्यासह पथकाने केली आहे; याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.