अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर सार्वजनीक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना राज्य सरकारच्यावतीने एक महिन्याचे धान्य मोफत वाटपाचा निर्णय घेतला आहे.
यासह आता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रतिसदस्य ५ किलो याप्रमाणे मे व जून या दोन महिन्याचे धान्य मोफत दिले जाणार आहे.
या निर्णयानुसार नगर जिल्ह्यातील ३१ लाख ४६ हजार ९६ लाभार्थ्यांना दोन महिन्याचे एकूण ३१ हजार ४६२ मेट्रीक टन धान्य मोफत मिळणार आहे.
राज्यात मागील महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी एक मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा केली.
या काळात गरजूंना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने विविध घटकांना मदत जाहिर केली आहे.
त्यानुसार सार्वजनीक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रीकाधारकांना एक महिन्याचे नियमीत असलेले धान्य मोफत वाटप केले जाणार आहे.
अंत्योदय अन्न योजनेत प्रति शिधापत्रीकानिहाय प्रतिमहिना ३५ किलो धान्य दिले जाते. तर प्राधान्य कुटुंब शिधापत्रीकाधारकांना शिधापत्रीकेतील व्यक्तीनिहाय ५ किलो धान्य स्वस्त दरात दिले जाते.
राज्य सरकार पाठोपाठ कोरोना प्रादुर्भावामुळे आलेल्या आर्थिक संकटास गरीबांना सामोरे जावे लागत असल्याचे लक्षात घेत केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सार्वजनीक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना मे, जूनसाठी प्रतिसदस्य प्रतिमहिना ५ किलो धान्य दिले जाणार आहे.