अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदा शहरातून जात असलेल्या लातूर – मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या कामांतर्गत भुयारी गटार व फूटपाथ आदी कामे होत नसल्याने श्रीगोंदा शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
या कामांना डावलत असल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांसह इतर नागरिकांनी हे काम बंद पाडले आहे. दरम्यान या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांसह शंभर नागरिकांच्या सह्यांचे निवेदन केंद्रीय रस्ते विकासमंत्री डॉ. नितीन गडकरी यांना पाठविले आहे.
तसेच या निवेदनाची प्रत खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनाही देण्यात आली. दरम्यान याबाबत सविस्तर वृत्त असे, श्रीगोंदा शहरात सध्या मार्गाचे काम सुरू आहे.
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय ते चंद्रमा पेट्रोल पंप दरम्यान काम बंद ठेवावे, भुयारी गटार व फूटपाथला मंजुरी आल्यानंतर काम सुरू करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करून पंचायत समिती कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत खासदार विखे यांनी शहरातून जाणाऱ्या रस्त्याला भुयारी गटार, फूटपाथची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले होते.
संबंधित कामाचे अंदाजपत्रक करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम बंद पाडले.