कोरोनाने बेरोजगार झालेल्या ‘त्या’ तरुणांनी निवडला गुन्हेगारीचा मार्ग

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- करोना लॉकडाऊनमुळे मजुरी काम करणार्‍या तरुणांच्या हाताला काम राहिले नसल्याने त्यांनी चोरीचा मार्ग स्वीकारला. 15 दिवस हे तरुण रात्रीच्या वेळी दुकानात चोरी करत होते.

स्थानिक गुन्हे शाखेसह तोफखाना पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून यात 12 आरोपींना अटक केली. चोरी गेलेला 27 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अरविंद अमृतलाल मुथ्या (रा. सावेडी) यांचे सावेडी उपनगरात महावीर सिरॅमिक्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे दुकान लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून बंद होते.

याचा फायदा नगरमध्ये घरफोड्या करणार्‍या तिघांनी घेतला. परम्या गायकवाड, लक्ष्मण भीमराव कुर्‍हाडे, आकाश मच्छिंद्र कुर्‍हाडे यांनी या दुकानाच्या मागील बाजूची खिडकी फोडली.

याची माहिती चोरट्यांनी प्रेमदान हाडको व परिसरातील मजुरी काम करणार्‍या तरुणांना दिली. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार गेल्याने या तरुणांंनी चोरीचा मार्ग निवडला.

दररोज रात्री त्या दुकानातील फोडलेल्या खिडकीतून आत प्रवेश करायचा व मिळेल ती वस्तू चोरी करून बाजारात विकत . तब्ब्ल 15 दिवस हा प्रकार सुरू होता.

या काळात दुकानातील सहा लाख 48 हजार 800 रुपये किमतीचे प्लंबिंग व बिल्डींगचे सामान चोरट्याने चोरून नेले होते. एक दिवस मुथ्या यांनी दुकान उघडल्यावर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.

त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक केली.

अहमदनगर लाईव्ह 24