अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-कोरोनाच्या महामारीने आठवडाभरात एकाच कुटुंबातील तिघांना मृत्यूने कवटाळले, तर तिघेजण कोरोनाशी रुग्णालयात झुंज देत आहेत.
ही घटना जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात घडली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जामखेड येथील जिल्हा परिषदेत बांधकाम विभागातील सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी लक्ष्मण जाधव (वय – 65), त्यांची पत्नी लक्ष्मी (वय-60) व मुलगा श्रीकांत या तिघांचा आठवड्यात एकापाठोपाठ कोरोनाने बळी घेतला.
त्यामुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अगोदर लक्ष्मण जाधव गेले. दोन दिवसांनी मुलगा श्रीकांत गेला. पती आणि मुलाच्या धक्क्यातून लक्ष्मीबाईही सावरल्या नाहीत. श्रीकांतची पत्नी रेखा शेवगाव येथे कोरोना संसर्गावर उपचार घेत आहे.
तर धाकटा मुलगा प्रशांत व त्याच्या पत्नीवर संगमनेरमध्ये उपचार सुरू आहेत. याच कुटुंबातील चार चिमुरडे मोठ्या धाडसाने या परिस्थितीचा सामना करीत आहेत.
एकीकडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे मात्र चोरटयांनी घरावर डल्ला मारला. संधीच फायदा घेत सोन्या-चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. या संदर्भात जामखेड पोलिसात गोविंद जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.