अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- अज्ञात वाहनाच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार झाला आहे. दरम्यान हा मयत तरुण निपाणी वडगाव येथील रहिवाशी असल्याचे समजते आहे. तर आणखी एक जण गंभीर जखमी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील राऊत व कांदळकर असा विवाह परिसरातील कार्यालयात संपन्न होत असताना विवाह निमित्त नातेवाईकांची सामानाची ने-आण सुरू होती.
यावेळी निकटवर्तीय नातेवाईक अमोल हरिभाऊ राऊत (वय 23) व दुसरा शिर्डी येथील तरुण सार्थक कोंडाजी कांदळकर (वय 19) दोघेही विवाह निमित्त सामानाची ने-आण करत असतानाच नेवासा रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिज वर अज्ञात वाहनाने हुल देताच दोघेही बाजूला पडले.
यात अमोल हरिभाऊ राऊत हा तरुण जागेवरच गतप्राण झाला व दुसरा तरुण कांदळकर यास जबर मार लागला आहे. बराच वेळ दोघेही तरुण रस्त्यावर पडून असल्याने उपचाराअभावी एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
जखमी सार्थक कांदळकर याच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत अमोल राऊत याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या दुःखद घटनेमुळे साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला.