अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- भारताची कोरोनास्थिती ही सगळ्यांसाठीच धोक्याची घंटा आहे. कोरोनाच्या विषाणूमुळे रोज बाधित होणाऱ्या नागरिकांची आणि मृत्यू होणाऱ्यांची संख्या पाहता आता
जगातील देशांनी पुढाकार घेऊन भारताला मदत केली नाही तर याचे जगावरही मोठे परिणाम होतील, असा इशारा युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरिटा पह्र यांनी दिला आहे.
युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरिटा पह्र यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, भारतातील दुःखद परिस्थिती ही सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. तीन हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत.
भारतात सध्या 2.6 कोटी कोरोना रुग्ण असून दोन लाख 26 हजार मृत्यू झाले आहेत. एकट्या भारतात 90 टक्के बाधा आणि मृत्यू होत आहेत.
जगातील 46 टक्के कोरोना रुग्ण भारतात असून एकूण कोरोना मृत्यूपैकी 25 टक्के मृत्यू हिंदुस्थानात होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
ही आपत्ती थांबवण्यासाठी खंबीर नेतृत्व गरजेचे असल्याचे युनिसेफचे दक्षिण आशियाचे प्रादेशिक संचालक जॉर्ज लॅरीए अड्जेयी यांनी निवेदनात म्हटले आहे.
युनिसेफच्या युनायटेड नेशन्स चाइल्ड फंडाने भारताला 20 लाख फेसशील्ड आणि दोन लाख सर्जिकलसह अतिरिक्त अत्यावश्यक जीवनरक्षक औषधांचा पुरवठा केला आहे.