अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ कारखान्याला केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून आर्थिक शिस्तीचे ‘प्रशस्तीपत्रक’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-  सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे विद्यमान चेअरमन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक कामगिरी करीत आहे.

कारखाना व्यवस्थापनाने सर्व व्यवहार पारदर्शक ठेवले आहेत. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी, कामगार तसेच इतरही सबंधित घटकांचे सर्व देणी वेळेवर चुकती करून केंद शासनाच्या १ जुलै २०१७ च्या जीएसटी करप्रणालीप्रमाणे सर्व करांची रक्कम केंद्र शासनाला नियमितपण अदा करून सबंधित सर्व रिटर्न वेळेत दाखल केले आहे.

केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाकडून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कामाची दखल घेवून कारखान्याच्या आर्थिक शिस्तीबद्दल ‘प्रशस्तीपत्रक’ दिले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिली आहे.

सहकारी साखर कारखानदारीपुढे अनेक आव्हाने होती आणि आजही आहे. २०१६ ला देखील परिस्थिती वेगळी नव्हती. त्यावेळी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात ऊसाची टंचाई होती.

अशा परिस्थितीत आ. आशुतोष काळे यांच्या खांद्यावर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी आली.

ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांचे नेहमीच हित जोपासनाऱ्या माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांवर कारखान्याचा अत्यंत जबाबदारीने कारभार करून त्यांनी आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर तीनच वर्षात कारखाना तोटामुक्त करून दाखविला आहे.

कारखान्याला संचित नफा मिळवून देत कारखाना व उद्योग समूह प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करीत असून सहकारी साखर कारखानदारीचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी दाखवून दिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पूर्ण देणी देवून कामगारांचे मासिक वेतन देखील नियमितपणे सुरु आहे.

कारखान्याला कोणत्याही प्रकारची देणी नसून शासनाला विविध कराच्या माध्यमातून देण्यात येणारी राज्य व केंद्र शासनाची देणी देखील मुदतीच्या आत शासनाच्या तिजोरीत जमा केली जात आहे. १ जुलै २०१७ पासून आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत या चार वर्षात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने शासनाची जीएसटीची सर्व देय रक्कम विहित नमुन्यात वेळेत भरून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे.

त्याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयाने कारखान्याच्या आर्थिक शिस्तीची दखल घेवून केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाने सी.बी.आय.सी.चे अध्यक्ष एम. अजितकुमार यांनी प्रशस्तीपत्र देवून कारखान्याच्या आर्थिक नियोजनाचे कौतुक केले आहे.

केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाने अशाच प्रकारे ज्या ज्या उद्योग व्यवसायांनी जीएसटी कर वेळेत अदा करून रिटर्न दाखल केला आहे त्यांचे देखील अशा प्रकारे कौतुक केले आहे. कारखान्याच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे यापूर्वी देखील अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार व प्रमाणपत्र मिळाले आहेत.

त्यामध्ये या प्रशस्तीपत्रकाची भर पडली आहे. त्याबद्ल कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार आशोकराव काळे व चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ, व्यस्थापन,कामगार यांचे अभिनंदन केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24