अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- “लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेत येईल. तुम्हाला जो अपेक्षित बदल आहे तोदेखील दिसून येईल. मार्च महिन्यापर्यंत बदल दिसून येतील,” असं सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
“जे काही आहे ते सर्व आता सांगता येणार नाही. सरकार पाडायचं असेल किंवा नवं सरकार स्थापन करायचं असेल तर गोष्टी या गुप्त ठेवाव्याच लागतात,” असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही, असं राणे म्हणाले.
काहीही झालं तरी हे सरकार ५ वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल अशी ग्वाही महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार आणि शिवसेने नेते खासदार संजय राऊत यांच्याकडून देण्यात येते.
मात्र, पहाटेच्या शपथविधीमुळे राजकारणातील अनिश्चितता सातत्याने वेगळ्या चर्चा घडवून आणते. आता, शरद पवार अचानक दिल्लीला रवाना झाल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
नारायण राणे यांनी भाजपमध्ये आल्यापासून अनेकदा सरकार कोसळणार असल्याच्या भविष्यवाणी केल्या आहेत. कधी दिवाळीनंतर सरकार कोसळेल, तर कधी नव्या वर्षात सरकार कोसळेल असं त्यांनी सांगितलं आहे.
मात्र, राणेंनी दिलेल्या डेडलाईनमध्ये सरकार काही कोसळलेलं नाही. राणे यांच्या या विधानाबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर, राणे काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला परब यांनी लगावला आहे.