अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- नेवासे तालुक्यात युरिया टंचाईने शेतकरी त्रस्त असल्याने पहाटेपासून दुकानांसमोर रांगा लावूनही रिकाम्या हाताने जाण्याऐवजी शेतकरी अखेर गरजेपोटी वेठीस धरलेल्या दुकानदाराने जास्त भाव लावला तरीही युरिया विकत घेत आहेत.
जास्त भावाने विक्री होत असले तरीही शेतकऱ्यांना शेतकरी निमूटपणे मिळेल तेवढे घेत आहे. दोन आठवड्यात ताणलेल्या पावसामुळे हवालदिल झाला होता. दोन दिवसांपासून आता पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित झालेल्या आहेत.
दडी मारलेल्या पावसाने हजरी लावताच हातातून जाणारी पिके पुन्हा पदरात पडतील, या आशेने शेतकरी खत डोस देण्यासाठी वणवण भटकत आहे. कुठेतरी एखाद्या दुकानात युरिया खत आले अशी माहिती कळताच त्या दुकानाकडे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची गर्दी होते.
शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता दुकानदार देखील आपली पोळी भाजून घेत आहेत. २६८ रुपये किमतीची युरिया गोणी नेवासे परिसरात ३५० रुपयांपेक्षा जास्त भावाने सर्रास विक्री होत आहे. विशेष म्हणजे या युरिया खताच्या गोणी बरोबर गरज नसलेल्या इतर खतांची देखील सक्ती केली जात आहे.
कपाशी, सोयाबीन, तूर, बाजरी या खरीप पिकांना बुस्टर डोस युरिया खताची गरज आहे. नेवासे तालुक्यात यावर्षी कमी पाऊस असला, तरी शेतकऱ्यांनी आशेपोटी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि तुरीचे पीक घेतले आहे. बाजरीचे प्रमाण कमी असले तरी कपाशी मात्र ऊस पिकाला पर्याय म्हणून घेण्यात आली आहे.
गेली दोन वर्षे शेतकऱ्यांना खत टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन, बाजरी, तूर या पिकांना एकरी ५० किलो, तर कपाशीला २५ किलो युरिया खताची आवश्यकता असते.
उपलब्ध आकडेवारीनुसार अशा प्रकारे कमी गरज असतानाही बागायत भागातील शेतकऱ्यांना खत दुकानदारांकडून ओरबडण्याचा धंदा व्हावा, यासाठी युरियाची टंचाई कृत्रिमपणे होत असल्याचा आरोप बागाईतदार शेतकरी करीत आहेत.