अवैध व्यावसायिकांकडून ऑडिओ क्लिपच्या हत्याराचा पोलिसांविरुद्ध वापर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- पोलिस स्टेशनची वाळू चोरीच्या अवैध व्यवसायाबाबत शुक्रवारी पुन्हा नवीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. नेवासे पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसायिकांची अनेक ठिकाणी मुजोरी सुरू असताना आता या व्यावसायिकांकडून ऑडिओ क्लिपच्या हत्याराचा वापर नेवासे पोलिसांविरुद्ध होत आहे.

कालच व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या पार्श्वभूमीवर नेवासे पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकाना मुख्यालयात बोलवण्यात आले. त्यानंतर नेवासे पोलिस स्टेशनमध्ये गंभीर वातावरणात कर्मचारी दिसत असताना नंतर आज पुन्हा एका पोलिस कर्मचाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हाट्स अप व फेसबुकला व्हायरल झाल्याने पुन्हा पोलिस दलात खळबळ उडाली.

या क्लिपमध्ये हा कर्मचारी म्हणत आहे. चालू महिन्याचे पैसे नाहीत आणि मागच्या महिन्याचेही पैसे आले नाही, याचे सतरा हजार रुपये घेऊन काय करता. त्यावेळी समोरची व्यक्ती म्हणाला तुमच्या हप्त्याचे काय असेल, ते बघून घ्या, आता गाडी धरली ना, ती आठ हजारात सोडली, तर काय फरक पडतो.

सहा हजार रुपये त्याच्याकडून आता घ्या. २ हजार मी देतो. त्यानंतर सदर कर्मचाऱ्याने आठ ते १० हजारांत गाडी सोडणार नाही तुमची. गाडी लावून देतो. उद्या एखाद्या वकिलाकडून जामीन करून घ्या, असे या क्लिपमध्ये म्हटले आहे. नक्की काय आहे हा प्रकार, कशाची आहेत ही वाहने,

नक्की कोण करतंय या क्लिप व्हायरल आणि आता हा पोलिस कर्मचारी कोण? नेवासे पोलिस स्टेशनमध्ये एवढी हफ्तेखोरी चालते का? या प्रश्नांची चर्चा नेवासे तालुक्यात रंगताना दिसत आहे. सदर कर्मचाऱ्याची चौकशी होऊन पोलिस अधीक्षक काय कारवाई करणार याकडे नेवासे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागल्याचे दिसत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24