‘मजा वाटायची, महिलांना गळा आवळून मारायचो..’, ११ महिलांची हत्या करणारा सायको सीरियल किलर ताब्यात

Published by
Ahmednagarlive24 Office

समाजात विचित्र मानसिकतेचे देखील लोक पाहायला मिळतात. पण त्यांची ही विचित्र मानसिकता एका वेगळ्या थराला गेल्यानंतर मात्र त्याचे पर्यावसन भयंकर असते. अशाच भयंकर मानसिक स्थितीतील सायको किलर पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आलं आहे.

त्याने एकापाठोपाठ एक अशा ११ महिलांचा निर्जन ठिकाणी नेऊन गळा आवळून खून केलाय. त्याने महीलांचाच खून का केला? हे देखील त्याने सांगितलेय. कुलदीप असे या सायको सीरियल किलरचे नाव आहे.

सावत्र आईने माझा फार छळ केला. लग्नानंतर माझी पत्नीही मला सोडून गेली. मला महिलांचा तिरस्कारच होता. त्यांना मारण्यात मला मोठीच मजा वाटायची, असा खळबळजनक जबाब त्याने दिलाय.

बरेली जिल्ह्यातील शाही आणि शिशगड परिसरातील ११ महिलांची एकापाठोपाठ हत्या झाली होती. यातील ६ खुनांची कबुली कुलदीपने दिली आहे. पोलिसांनी शुक्रवारी त्याला माध्यमांसमोर हजर केले.

कुलदीप हा निर्जन ठिकाणी महिलेचीच साडी किंवा दुपट्टा वापरून गळा आवळून महिलेची हत्या करायचा. आठवण म्हणून तिच्याकडचे काहीतरी काढून घेऊन जायचा. तो नवाबगंजलगतच्या बकरगंज समुआ गावचा रहिवासी आहे.

गेल्या १३ महिन्यांत बरेली परिसरात ११ महिलांची हत्या झाली आहे. मारेकरी कोण, ते मात्र उलगडत नव्हते. पोलिसांनी अखेर याकडे सीरियल किलिंग म्हणून पाहिले आणि तपासाला दिशा दिली.

तीनच दिवसांपूर्वी पोलिसांनी संशयिताची तीन रेखाचित्रे जारी केली होती. पोलिसांना अनेक फोन आले. माहिती देणाऱ्याची खातरजमा झाल्यानंतर कुलदीपला अटक करण्यात आली.

त्याने जबाबात असे म्हटले आहे की, माझी बायको मला सोडून गेल्यानंतर मला ड्रग्जचे व्यसन लागले. कोणत्याही स्त्रीकडे साधे पाहिले तरी मला संताप यायचा. त्यामुळे तिला गळा आवळून मारायचो असेही तो म्हटला आहे.

Ahmednagarlive24 Office