अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- राहुरी तालुक्यामध्ये कोविड लसीकरणाबाबत ज्या गावांमध्ये जास्त लोकसंख्या असेल
त्या गावाला प्राधान्य देऊन तेथील मतदार यादीनुसार लसीकरण करावे, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आरोग्य विभागाला केल्या आहेत.
राहुरी तालुक्यातील मांजरी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या २० गावांच्या दक्षता समितीच्या प्रतिनिधींसमवेत ना. तनपुरे यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी ते बोलत होते. बैठकीस प्रांताधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार फसियोद्दीन शेख, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, वैद्यकीय अधिकारी मल्हारी कौतुके यांच्यासह मांजरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील स्थानिक दक्षता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोविड लसीकरणाबाबद सुसूत्रता यावी या हेतूने ना.तनपुरे यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी न करता नागरीकांना त्रास होऊ नये, या हेतूने लसीकरण करण्याच्या सूचना केल्या.
पहिला डोस आपल्या गावातील केंद्रावर तर दुसरा डोस मांजरी आरोग्य केंद्रावर दिला जाईल. दोन्ही डोसमधील अंतर ८४ दिवस असल्याने मध्ये कुणीही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर दबाव टाकू नये.
लसीच्या उपलब्धेनुसार प्रत्येकाला लस देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ना. तनपुरे यांनी केले आहे.