अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण हे शस्त्र सध्या उपयुक्त ठरत आहे. यामुळे जिल्ह्यात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे.
यातच आता हि मोहिमेला आणखी बळ प्राप्त होणार आहे. कारण जिल्ह्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे.
शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू झाली.
प्रारंभी आरोग्य कर्मचारी, नंतर फ्रंटलाइन वर्कर व नंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. मध्यंतरी १८ ते ४४ हा टप्पाही सुरू झाला होता; परंतु नंतर तो बंद करण्यात आला. दरम्यान, सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येत आहे.
दरम्यान, आता लसीकरणाचा पुढचा टप्पा जाहीर झाला असून, यात ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी नोंदणीची आवश्यकता नसून थेट केंद्रावर जाऊनही नागरिकांना लस घेता येणार आहे.
दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात ६ लाख २३ हजार ८४ जणांनी पहिला, तर १ लाख ८० हजार ७४ जणांनी दुसरा, असे एकूण ८ लाख ३ हजार १५८ लसीचे डोस देण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे.
दुसरी लाट सरल्यामुळे लोक आता घराबाहेर पडू लागले आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण युद्धपातळीवर राबविने गरजेचे आहे. तसे प्रयत्न जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहेत.