अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लागला आहे. यामुळे दरदिवशी हजारोंच्या संख्येनें कोरोनाबाधितांची भर जिल्ह्यात पडत आहे.
तसेच या विषाणूमुळे दररोज अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. यामुळे जिल्ह्यातील मृत्युदर देखील वाढला आहे.
मात्र यातच या रोगाला आळा बसावा यासाठी लसीकरण मोहीम जिल्ह्यात सुरु आहे. यातच जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
मात्र या परिस्थितीतही जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. शनिवारी लॉकडाऊन असले तरी प्रशासनाने एकूण ३९ केंद्रांवर लसीकरण सुरू ठेवले होते.
या सर्व केंद्रांवर दिवसभरात ५,२५० लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४ हजार ९५१ डोस (९४ टक्के) देण्यात आले.
यात सर्वाधिक डोस ग्रामीण आरोग्य केंद्रातील २३ लसीकरण केंद्रांवर देण्यात आले. ती संख्या ३,३८४ होती.
याशिवाय महापालिकेच्या आठ केंद्रांवर ९८३, तर आठ प्राथमिक आरोग्य केंद्रात ५८४ जणांना लस देण्यात आली. दरम्यान, आतापर्यंत २ लाख ५८ हजार १७६ जणांना पहिला डोस, तर २९ हजार जणांना दुसरा डोस असे एकूण २ लाख ८७ हजार १८३ डोस देण्यात आले आहेत.