अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- “कोरोना महामारी च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने संपूर्ण जगभरातीलच जीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे संसार उद्वस्त झाले. आरोग्य विभाग आणि एकंदर यंत्रणा कोलमडून पडली.
दुसरी लाट ओसरतानाच कोरोना विषाणूचा डेल्टा प्लस हा नवीन अधिक संसर्गजन्य प्रकार तिसरी लाट घेऊन येत आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपवायची असल्यास लसीकरण करणे अत्यंत महत्वाचे आहे” असे प्रतिपादन स्वास्थ हॉस्पिटलचे संचालक डॉ. अभिजित पाठक यांनी केले.
स्टेप अप चॅरीटेबल फौंडेशन, मुंबई आणि स्नेहालय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देह व्यापाऱ्यातील बळी महिलांच्या कोरोना लसीकरण कार्यक्रमच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी मा. शिवाजी जाधव (जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय), विशेष निमंत्रित मा. प्रवीण अहिवळे (समुपदेशक, एकात्मिक सल्ला व समुपदेशन केंद्र, जिल्हा रुग्णालय),मा. प्रवीण मुत्याल (सदस्य, बाल कल्याण समिती, अहमदनगर) आदी उपस्थित होते.
देह व्यापाऱ्यातील बळी महिलांनी कोरोना लसीकरणासोबत आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी करावीत,असे आवाहन देखील या वेळी करण्यात आले. शिवाजी जाधव यांनी कोरोना आजाराची लक्षणे आणि त्यावर घ्यावयाची खबरदारी, याबाबत सर्व महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रविण मुत्याल यांनी केले. महिलांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, आरोग्य केंद्रे, सक्षमीकरण केंद्र, संघटन, लॉकडाऊन काळात वाटप केलेला कोरडा शिधा, गिव्ह इंडीया संस्थे मार्फत केलेली आर्थिक मदत आणि महाराष्ट्र शासनाने केलेली आर्थिक मदत याबाबत त्यांनी माहिती दिली.
स्टेप अप फौंडेशनच्या आर्थिक सह्योगाने देह व्यापाऱ्यातील बळी महिलांच्या कोरोना लसीकरणासाठी स्नेहालय संस्थेने पुढाकार घेतलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील किमान २०० महिलांना लस देण्यासाठी स्टेप अप फौंडेशनने राबविलेल्या उपक्रमाबाबत प्रविण मुत्याल यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक बुरम यांनी केले तर उपस्थितांचे आभार अशोक चिंधे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक बुरम, आकाश काळे, फिरोज पठाण, प्रवीण बुरम, संजय जिंदम, मझहर खान, मीना पाठक, सविता करांडे, आदींनी प्रयत्न केले.