घरोघरी जाऊन कोरोनाची लस दिली तर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात मोठे यश येईल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात लसीकरण प्रभावी ठरत असल्याचे विविध देशांतील लसीकरणावरून दिसत आहे.

महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. परंतु राज्य सरकारने सध्या लावलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास अडचणी येत आहेत.

ग्रामीण भागात लसीकरण केंद्र संख्येने कमी व दूर अंतरावर असल्याने प्रवास करून केंद्रावर जाऊन लस घेणे लोकांसाठी जिकिरीचे ठरत आहे.

१ मेनंतर तर १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यावेळी लसीकरण केंद्रावरील गर्दी वाढून संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे.

लसीकरणातील या सर्व अडचणी दूर करून ‘घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम’ राज्य सरकारने हाती घ्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

पटोले यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनावर मात करण्याकामी लसीकरण हेच जगभरात प्रभावी अस्त्र ठरलेले आहे. इस्रायलसारख्या छोट्या देशाने ते करून दाखवले आहे.

अमेरिका, ब्रिटनसह इतर देशांनीही लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवल्याने कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. महाराष्ट्रानेही देशात लसीकरणात मोठी आघाडी घेऊन १ कोटीपेक्षा जास्त लसीकरण केले आहे.

ही लसीकरण मोहीम राबवण्यासाठी मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात लागणार आहे, हे लक्षात घेऊन सरकारी यंत्रणेबरोबरच, खाजगी रुग्णालयांतील कर्मचारी वर्ग, स्वयंसेवी संस्था-संघटनांची मदत घेता येईल.

पोलिओ या महामारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशपातळीवर मोठ्या प्रमाणात अशीच मोहीम राबवण्यात आली होती. याच धर्तीवर घरोघरी जाऊन कोरोनाची लस दिली तर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात मोठे यश येईल

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24