अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- कोरोना विषाणूशी सुरु असलेला लढा जिल्ह्यात अद्यापही सुरु आहे. यातच या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने हाती घेण्यात आली आहे.
नगर जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे. यातच नागरिकांचा देखील यासाठी चांगला प्रतिसाद लाभतो आहे.
नुकतेच जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील २२ गावांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस पोहोचली असून ५ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीकांत शेळके यांनी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन खामकर आणि जिल्हा परिषद सदस्या पंचशीला गिरमकर यांचे मार्गदर्शन घेऊन कार्यक्षेत्रातील सर्वच २२ गावांमध्ये लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन केले.
एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यास या नियोजनामुळे यश आले. आरोग्य सेवक कर्मचारी तसेच आशा सेविकांचे सहकार्य घेऊन २२ गावांमध्ये लसीकरण कार्यक्रम राबविला.
लसीकरणासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचाही सहभाग घेऊन पाच हजारांच्यावर ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले.
लसीकरणात पुढाऱ्यांचा होत होता हस्तक्षेप :- कोरोनाची दुसऱ्या लाटेमध्ये बाधितांची आकडेवारी वाढली. तसेच मृत्यूही वाढल्यामुळे कोविड प्रतिबंधक लसींची मागणी वाढली. लसीकरण कार्यक्रमात स्थानिक राजकीय हस्तक्षेपाने आरोग्य विभाग हतबल झाला होता.
आढळगावात लसीकरणासाठी कार्यक्षेत्रातील नागरिकांची गर्दी होत होती. गर्दीचा फायदा घेऊन राजकीय पदाधिकारी कुटुंबीयांसह नातेवाइकांचेही लसीकरण करून घेण्याचा आटापिटा करत होती.