अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- गावपुढाऱ्याच्या हस्तक्षेपातून मर्जीतील लोकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचा प्रकार तालुक्यातील शिलेगाव येथे घडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील शिलेगाव येथे आरोग्य विभागाकडून ५० लसीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, लस देताना वशिलेबाजी झाल्याने आरोग्य उपकेंद्रावर काहीकाळ गोंधळ उडाला. या लसीकरण मोहिमेत स्थानिक पुढाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने अनेकांना लस मिळू शकली नाही,
असा आरोप ग्रामस्थांनी केला. लसीकरणासाठी गेलेल्या ग्रामस्थांना लस शिल्लक नसल्याची माहिती देऊन माघारी पाठवण्यात आले. मात्र, काही वेळेनंतर मर्जीतील लोकांना वशिलेबाजीने लस देण्यात आली. आपल्या जवळच्या लोकांच्या नावाची यादी तयार करून लसीकरण सुरू करण्यात आले होते.
गावातील इतर ग्रामस्थांना मात्र तुमचे यादीत नाव नसल्याने तुम्हाला लस मिळणार नाही, असे सांगून परत पाठवण्यात आले. या यादीत ठरावीक लोकांचे नावे असल्याची शंका आल्याने ही यादी कोणी केली? असा सवाल झाला. ग्रामस्थ व आरोग्य कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाला.
या घटनेबाबत ग्रामस्थ राहुरीचे तहसीलदार फसियोद्दिन शेख यांच्याकडे तक्रार करून संबंधितावर कारवाईची मागणी करणार आहेत.
कोरोनाच्या काळात प्रत्येकाने वाद विवाद, राजकारण बाजूला ठेवून एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, अशा परिस्थितीत राजकारण होत असेल, तर हे फार दुर्दैवी आहे. राजकारण कुठे व कसे करायचे हे भान गाव पुढाऱ्यांनी ठेवणे गरजेचे आहे.