file photo

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयास लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या तब्बल १० हजार सिरिंजची मदत पुरविण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहा हजार सिरिंज जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या आहेत. कोरोना लसीकरणासाठी कमतरता भासणाऱ्या सिरिंजचा वेळेत पुरवठा झाल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

तसेच गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले, लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावर आम्ही प्रयत्नशील असून, सुशिक्षित लोकांनी पुढाकार घेऊन लसीबाबतच्या गैरसमजुती दूर करून लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

दरम्यान याप्रसंगी प्रभारी तहसीलदार मनोज भोसेकर म्हणाले, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लस घ्यावी, यासाठी पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन नागरिकांना लस घ्यायला प्रेरित करावे. त्यामुळे लसीकरण मोहीम यशस्वी होईल.