अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- लसीकरणाचा गोंधळ उडू नये यासाठी पहिल्या टप्प्यात ३० ते ४४ वयोगटातील लोकांचे घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय राज्य कृती दलाने घेतला आहे.
एकीकडे केंद्र सरकार लसींचा पुरेसा पुरवठा करत नसतानाच १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा निर्णय जाहीर केल्यामुळे राज्यांपुढे लसीकरण नियोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ४५ वयापुढील लोकांचे लसीकरण अद्याप पूर्णपणे झालेले नाही.
लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही या पार्श्वभूमीवर १८ ते ४४ वयोगटातील लोकांना एकाच वेळी लस देण्याचे धोरण स्वीकारल्यास महाराष्ट्रात मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ३० ते ४४ वयोगटातील लोकांना पहिल्या टप्प्यात प्राधान्यांने लस दिली जावी,
अशी भूमिका राज्य कृती दलाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मांडली आहे. याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असे सूत्रांनी सांगितले.
या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह, डॉ प्रदीप व्यास, प्रधान सचिव विकास खारगे, कृती दलाचे अध्यक्ष डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित व वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.
लसीकरणाचा वेग वाढवताना शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण होणे आवश्यक असल्याचे यावेळी डॉ शशांक जोशी यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून लसींचा होणारा पुरवठा तसेच एकूण उपलब्ध होणार्या लसींची संख्या लक्षात घेता ३० ते ४४ वयोगटातील लोकांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जावे,
अशी भूमिका बैठकीतील सदस्यांनी मांडली. अजूनही ४५ पुढील लोकांचा लसीचा दुसरा डोस शिल्लक आहे. त्यामुळे ३० ते ४४ वयोगटातील लोकांचे आधी लसीकरण करावे अशी भूमिका डॉ शशांक जोशी यांनी मांडली.
याबाबत डॉ शशांक जोशी यांना विचारले असता, तिसर्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे, पॉझिटिव्ह दर कमी करणे तसेच गर्दी टाळणे, मास्क व सुरक्षित अंतर यांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर हा पाच टक्क्यांपेक्षा कमी असला पाहिजे तसेच जिल्ह्यांमध्ये ७० टक्के लसीकरण झाले पाहिजे व लोकांनी कोरोनाच्या नियमांचे पूर्णपणे पालन केले तर दैनंदिन व्यवहार पूर्णपणे खुले करणे योग्य ठरेल, असेही डॉ जोशी म्हणाले.
तिसर्या लाटेत युवा पिढी म्हणजे २० ते ४० वयोगटातील लोकांना फटका बसू शकतो. साधारणपणे ३.५ टक्के लहान मुलांना करोनाचा त्रास होऊ शकतो हे लक्षात घेता सुयोग्य पद्धतीने लसीकरण करणे आवश्यक आहे. यासाठीच लसींची उपलब्धता लक्षात घेऊन ३० ते ४४ वयोगटाला प्राधान्य दिले पाहिजे, असेही डॉ जोशी यांनी सांगितले.