अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-राहाता तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रावर शुक्रवारपर्यंत लस उपलब्ध होईल की नाही? याबाबत साशंकता असल्याने तसेच लसीच्या उपलब्धते संदर्भात कुठल्याही प्रकारची लेखी माहिती नसल्याने लसीकरण केंद्रातील कर्मचारी व डॉक्टरांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.
किमान चार-पाच दिवस लस उपलब्ध होईल अशी चिन्हे दिसत नसल्याने शनिवारपर्यंत राहाता तालुक्यातील केंद्रावर लसीकरण बंद राहणार आहे.कोरोना टाळण्याकरिता शरीरातील प्रतिकारशक्ती प्रभावी व सक्षम असण्यासाठी व्हॅक्सिनेशन (लसीकरण) महत्त्वाचे आहे.
याबाबत नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती झाल्याने लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रांवर गर्दी वाढली आहे. यापूर्वी लस उपलब्ध असायची तर ती घेण्यासाठी नागरीक फारसे इच्छुक नसायचे. त्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांवर लसीकरणासाठी माणस शोधण्याची वेळ येत असे.
आता मात्र लसीच्या तुलनेत लस घेणारांची संख्या दुप्पट तिप्पट राहत असल्याने लसीचा तुटवडा भासतो आहे.त्यामुळे लोकांना लस मिळणे कठीण झाले आहे.
एकीकडे लसीचा तुटवडा तर दुसरीकडे लसीकरणसाठी नागरिकांचा मोठा आकडा त्यात नागरिकांकडून रोजच लसीबाबत विचारणा त्यामुळेच आरोग्य विभागातील डॉक्टर-कर्मचारी यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.
अनेकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने दुसऱ्या डोसचे काय? अशी चिंता अनेकांना भेडसावत आहे तर १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे सुद्धा रजिस्ट्रेशन होत आहे. आपला नंबर कधी येईल व लस घेऊन आपण केंव्हा सुरक्षित होऊ याच प्रतिक्षेत अनेकजण आहेत.