अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- वासुंदे ते खडकवाडी (ता. पारनेर) रस्ता दुरुस्ती कामाच्या गैरकारभाराची चौकशी जाणीवपूर्वक संबंधित अधिकारी दिरंगाई करीत असल्याचा आरोप करुन सदर प्रकरणाची त्वरीत चौकशी करुन संबंधित
ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.
या गैरकारभाराची चौकशी न झाल्यास स्थानिक ग्रामस्थांसह नगर-कल्याण महामार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वासुंदे ते खडकवाडी रस्ता दुरुस्तीचे काम एक वर्षापासून सुरु होते. सदर रस्त्याचे काम प्लॅन, इस्टिमेट प्रमाणे झालेले नसून
हे काम निकृष्ट असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी होण्यासाठी अनेक वेळा संबंधित अधिकारी व विभागाला पत्रव्यवहार करून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
वासुंदे ते खडकवाडी रस्ता दुरुस्ती कामाच्या गैरकारभाराची चौकशी करुन दोषी असलेल्या ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.