अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे शनिवारी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
विनोद दुआ यांची मुलगी मल्लिका दुआ हिने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. विनोद दुआ यांच्या पार्थिवावर उद्या लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दिल्लीतील निर्वासितांच्या कँपमधून सुरु झालेला त्यांचा प्रवास हा 42 वर्षे पत्रकारितेतील अनेक शिखरं पार करण्यापर्यंत झाला. सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत निवडणुकांचे विश्लेषण करण्यास विनोद दुवा यांनी सुरुवात केली.
त्यानंतर हिंदी आणि इतर भाषांमध्ये हा ट्रेन्ड सुरु झाला. कोण होते विनोद दुआ? हिंदी पत्रकारितेतील बहुचर्चित नाव म्हणून विनोद दुवा यांच्याकडे पाहिले जाते.
वक्तृत्व शैली, अचूक विश्लेषण आणि मुद्देसूद मांडणी यामुळे आजही त्यांचे विश्लेषणात्मक कार्यक्रम आवर्जुन पाहिले जातात. विनोद दुआ यांनी दूरदर्शन आणि एनडीटीव्ही इंडियामध्ये दीर्घकाळ काम केले होते.
1996 मध्ये त्यांना रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच, भारत सरकारने 2008 मध्ये त्यांना पत्रकारितेसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
जून 2017 मध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना मुंबई प्रेस क्लबतर्फे रेडइंक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.