अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचे संकट होते. यातच कोरोनाचा हॉट स्पॉट बनलेले संगमनेर मध्ये तर दयनीय अवस्था होती. यातच – कोरोनाच्या संकटात ज्यांच्यावर जबाबदारी होती, ते मुंबईत जाऊन बसले होते.
यामुळे खासगी व्यवस्थेच्या भरोशावर रुग्ण सोडले. सर्वसामान्य माणसांचा मोठा पैसा खर्च झाला आहे. तीस वर्षांनंतर संगमनेरात उपजिल्हा रुग्णालय आले.
त्यामुळे नेमका संगमनेरचा कोणता विकास झाला? तुम्ही सत्ता उपभोगायला आणि केवळ मंत्री म्हणून मिरवायला आहात का? असा शाब्दिक टोला राधाकृष्ण विखेंनी नाव न घेता महसूलमंत्र्यांना लगावला आहे.
सोमवारी शहरातील मालपाणी लॉन्स येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने वज्रनिर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना विखे म्हणाले, सर्व सत्तास्थाने असताना संगमनेर तालुक्यातील लोकप्रतिनिधी नागरिकांसाठी कोविड सेंटर देखील सुरू करू शकले नाहीत.
या संकटात तालुक्याचे लोकप्रतिनिधी खरेच कार्यरत होते का? येथे खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लाखो रुपयांची लूट केली. त्याची चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते व आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.