अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-अर्थसंकल्पाच्या चर्चेत सहभाग घेवून भाजपाचे जेष्ठनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवून शेतकरी, दूध उत्पादक, मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांबाबत सरकारला जाणीव करुन देत सामाजिक विभागाच्या निधीला कात्री लावल्याबद्दल सरकारवर टिकेची झोड उठविली.
राज्यातील कोरडवाहू शेतकर्यांसाठीही कोणतीच योजना जाहीर केलेली नाही. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या सुरु झालेल्या योजनांनाही कोणत्याही निधीची आर्थिक तरतुद नसल्याने हा अर्थसंकल्प म्हणजे राज्याची समान फसवणूक असल्याची घणाघाती टिका भाजपाचे जेष्ठनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
वीजबिलाच्या मुद्यावरून विखेंचे सरकारवर टीकास्त्र वीज बिलांच्या बाबतीत विज वितरण कंपनी कडून शेतकर्यांवर अन्यायच झाला. लाखो रुपयांची बिल पाठवली, कनेक्शन कट करण्यासाठी दहशत निर्माण केली पण अर्थसंकल्पात वीज बिलांच्या सवलतीबाबत आघाडी सरकार कोणताही दिलासा शेतकर्यांना देवू शकलेले नाही.
मागील युती सरकारने नदीजोड प्रकल्पाला 50 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केली होती. नगर, नाशिक, मराठवाड्यासह दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी ही योजना सुरु झाली होती. प्रत्यक्षात ही योजना गुंडाळून टाकण्यात आली आहे.
या योजनेसाठी निधीची तरतुद करण्यात आली असती तर वर्षानुवर्षे चाललेले पाण्याचे तंटे निकाली निघले असते. नगर जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचा प्रश्नही आवर्जून उपस्थित करत दुष्काळी भागातील या तालुक्यांना पाणी मिळू द्यायचे नाही असा चंग काहींनी बांधला आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.