विक्रम पाचपुते पुन्हा तालुक्‍यातून गायब !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-  बबनदादांना या निवडणुकीत संधी द्या, कदाचित ही दादा लढवणार असलेली शेवटची निवडणूक आहे असे म्हणत येणाऱ्या काळात आपण स्वतः कार्यकर्त्यांच्या बरोबरीने काम करणार असल्याचे दिवास्वप्न कार्यकर्त्यांना दाखवणारे विक्रम पाचपुते कुठे आहेत? अशी विचारणा कार्यकर्त्यांमध्ये आता जोर धरू लागली आहे.

विक्रम पाचपुते हे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे जेष्ठ चिरंजीव. आ.पाचपुते पालकमंत्री पदावर असताना विक्रम पाचपुतेंनी राजकारणात प्रवेश केला. वडिलांच्या सत्तेच्या काळात पायाला भिंगरी लावून जिल्हाभर फिरणारे हेच विक्रम पाचपुते हे वडील आमदारकीला पराभूत होताच तब्बल ५-६ वर्षासाठी विजनवासात गेले.

त्या नंतर पुन्हा २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी श्रीगोंदा तालुक्‍यात मुक्काम ठोकत इथून पुढे युवकांसोबत सक्रिय काम करणार असल्याचे सूतोवाच केले. परंतु या निवडणुकीनंतर ही त्यांनी इतिहासाची पुनरावृत्ती करत अंग टाकून देत काढता पाय घेतला. निवडणूक कालावधीत युवकांसमोर भाषणे ठोकताना इथून पुढे तालुक्‍यात तळ ठोकणार असल्याचे जाहीर आश्वासित केले होते.

युवकांनीही विक्रम पाचपुते यांना तन-मन- धनाने साथ देत माजी मंत्री पाचपुते यांना विजयी करण्यात महत्वाची भूमिका बजावली. या निवडणुकीत युवकांची भूमिका निर्णायक ठरली. ‘पण निवडणूक निकाल लागताच विक्रम पाचपुते पुन्हा तालुक्‍यातून गायब झाले आहेत.

आता जिल्हा परिषदेची निवडणूक जवळ आली आहे. याचे बिगुलही आता जोरकसपणे वाजू लागले असून. आ.पाचपुते यांच्या काष्टी गटात पाचपुते यांचे बंधु सदाशिव पाचपुते यांच्या निधननंतर काष्टी गटात जोरदार रस्सीखेच असणार आहे.

सदाशिव पाचपुते यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र साजन या जागेवर उमेदवारीसाठी दावा सांगतील अशी शक्‍यता आहे. तर प्रतिभा पाचपुते यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्‍यता कार्यकर्त वर्तवत आहेत.