अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- नगर तालुक्यातील जेऊर येथे ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे आपत्कालीन परिस्थितीत संपुर्ण गावाला संदेश जाणार आहे.
एका टोल फ्री क्रमांकावर घटनेची माहिती दिल्यानंतर यंत्रणा कार्यान्वित होवुन त्याचा संदेश संपूर्ण गावातील सदस्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे.
दरोडा, वाहन अपघात, वन्यप्राण्यांचा हल्ला, महिला व लहान मुलांसंदर्भातील गुन्हे तसेच गावाला सतर्कतेचा इशारा या घटनांमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करता येणार आहे.
या यंत्रणेत एका घटनेचा एकच संदेश जात आहे. त्यामुळे एका घटनेबाबत कितीही नागरिकांनी फोन केला तरीही संदेश एकदाच वितरीत होत असल्याने नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत नाही.
ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्याने जेऊर ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गावामध्ये ग्रामसरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याने गुन्हेगारांवर अंकुश राहणार आहे.
परिसरात गुन्हेगारीच्या प्रमाणात घट होणार असून, नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत जास्तीत जास्त यंत्रणेचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.