अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- अवघ्या जगभरात धुमाकूळ घालत अनेक नागरिकांचा बळी घेणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी आता सरकारी यंत्रणेसह गाव पातळीवर ग्रामस्थ देखील पुढाकार घेऊन कठोर उपाय योजना करत आहेत.
नगर तालुक्यातील मांडवे येथे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनीच स्वतः हून बुधवार दि. १९ ते शनिवार दि. २९ पर्यंत ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यू पुकारला आहे.
या अंतर्गत कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. मांडवे गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढला आहे. गावातील सद्यस्थितीत सक्रीय रुग्णांची संख्याही काळजी वाढविणारी आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.
त्यामुळे कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने गावामध्ये जनता कर्फ्यू पुकारला आहे. जनता कर्फ्यू दरम्यान नागरिकांनी सर्व आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच गावातील सर्व रस्ते बांबू लावून बंद करण्यात आले आहेत. वैद्यकीय सेवा, मेडिकल पूर्ण वेळ, घरपोच गॅस वितरण सेवा, सर्व मान्यताप्राप्त आर्थिक आस्थपना ( बँक, पतसंस्था, सेवा सोसायटी ),
दूध व दुग्ध जन्य पदार्थ खरेदी व विक्री सकाळी १तास सुरू राहणार आहे. तर, किराणा दुकाने, भाजीपाला, फळे, चिकन, अंडी, मटण, इतर मांसाहारी पदार्थ खरेदी व विक्री, सर्व खासगी आस्थापना बंद राहणार आहेत.