अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- श्री.विनायक देशमुख यांचे पक्षकार्य हे राजकारणापेक्षा समाजकारणाकडे झुकणारे असून, समाजसेवक अण्णा हजारे आणि पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विचाराचा वारसा ते या पदाच्या माध्यमातून पुढे नेत आहे.
त्यांच्याकडे वैचारिक बैठक असून, संकुचित वृत्तीने गटबाजीकडे त्यांनी कधी लक्ष दिले नाही. पण पक्षकार्य ते निष्ठेने करत असून, राज्यात ठिकठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे, अशा व्यक्तींची प्रदेश सरचिटणीसपदी फेरनिवड झाली याचा नगर व भिंगार काँग्रेसला अभिमान आहे,
असे गौरवाद्गार शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी काढले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी विनायकराव देशमुख यांची निवड करण्यात आली. याबद्दल श्री.देशमुख यांचा त्यांच्या लालटाकी येथील संपर्क कार्यालयात शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रदेश सदस्य व भिंगार पक्षाचे प्रमुख नेते शामराव वाघस्कर, शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान आदि उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना श्री.देशमुख यांनी निष्ठेने पक्ष कार्य करतांना अनेक अडचणी उद्भवतात पण, अडचणींवर मात करुन सामाजिक जाणिव ठेवून निष्ठेने कार्य केल्यास त्याचे उचित फळ प्राप्त होते, मात्र त्यासाठी संयम ठेवून काही कालावधी जावू द्यावा लागतो.
तेव्हा, असे यश मिळते. अर्थात आपल्यासारख्या राज्यातील पक्ष सहकार्याच्या शुभेच्छामुळे हे यश आहे, असे मी मानतो. सर्वश्री वाघस्कर, पवार, अभिजित कांबळे, अज्जूभाई शेख आदिंनी श्री.देशमुख यांना शुभेच्छा देतांना त्यांच्या पक्ष कार्याचा गौरव केला. शेवटी रमेश कदम यांनी आभार मानले.