अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील पद्मभूषण अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिरासह तालुक्यातील सर्वच कोविड सेंटरमधील स्वयंसेवकांचे त्वरीत लसीकरण व्हावे अशी मागणी पंचायत समिती सदस्या कल्याणी अतुल लोखंडे यांनी केली.
सलग दुसऱ्या वर्षी कोरोना महामारीने हाहाकार माजवला असून यंदाच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात अगदी तळागाळात कोरोनाने शिरकाव केल्याने अनेकांचे बळी गेले.
अनेकांना प्राथमिक लक्षणे आढळून आली मात्र भितीपोटी वैद्यकीय उपचार न घेता घरगुती इलाज करत स्वतः घरातच वेगळे व एकटे राहू लागले.
मात्र सुरक्षित दखल न घेतल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला. अखेर तालुक्यात अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासह लोकसहभागातून कोविड विलगीकरण कक्ष उभारण्यात आले.
यामधे तालुका व तालुक्याबाहेरील अनेक रुग्ण मोफत वा अगदी कमी खर्चात प्राथमिक उपचारही घेत आहे. त्यांच्या उपचारार्थ डॉक्टरसह त्या त्या गावातील वा परीसरातील तरुण स्वयंसेवक म्हणून आरोग्य सेवा पुरवत आहेत.
कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे कुणी कुणाजवळ जात नाहि. मात्र माणुसकीचे दर्शन घडवताना आपला जीव धोक्यात घालून हे स्वयंसेवक कोरोनाबाधित रुग्णांना पाणी, जेवण, औषधे देण्याचे काम करत आहेत. आपुलकीने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत.
त्यामुळे देवदैठण येथील पद्मभूषण अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिरासह तालुक्यातील सर्वच कोविड सेंटरमधील स्वयंसेवकांची काळजी घेताना कोरोना संदर्भातील वैदयकीय तपासणी करून
त्यांचे त्वरीत लसीकरण व्हावे अशी मागणी पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे यांनी पंचायत समिती, श्रीगोंदा व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्याकडे केली आहे. माणसात अंतर हवे …
माणुसकीत नको :- माणसात अंतर हवे … माणुसकीत नको या सामाजिक जाणिवेतून स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता कोविड सेंटरमधे कोरोना रूग्णांची सेवा सुश्रृशा स्वयंस्फूर्तीने करत असलेले स्वयंसेवक हेच खरे कोरोना योद्धे आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.