अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-बेरोजगार, रोजंदारी मजदूर, हातावर पोट असणारे आणि इतर असंघटीत कामगार या घटकांना मदत करा, नंतरच लॉकडाऊनचा विचार करा, असा सल्ला काँग्रेस नेते आिण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चव्हाण यांनी दिला आहे.
चव्हाण यांच्या या विधानामुळे लॉकडाऊनच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांमध्येच मतमतांतरे असल्याचं उघड झालं आहे. चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रक काढून या मागण्या केल्या आहेत. राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे.
२०२० मध्ये आढळून आलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी राज्यात सापडत आहेत. केंद्र सरकारने गेल्या वर्षी मार्चमध्ये अचानकपणे कोणतेही नियोजन न करता लॉकडाऊन घोषित केला होता.
सारासार विचार न करता घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला व भारतातील ३ कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेले.त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन अर्थव्यवस्थेचे कमीत-कमी नुकसान होईल
आणि कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यास मदत ठरेल अशा प्रकारे लॉकडाऊनचे नियोजन करणे आवश्यक आहे, असं सांगतानाच कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याची मागणीही चव्हाण यांनी केली आहे.
लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना द्या, लॉकडाऊनचा कालावधी कमीत-कमी ठेवा, लॉकडाऊन काळात बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावा.
यासाठी प्रसंगी आमदार व खासदार स्थानिक विकास निधीचा वापर करावा, खासगी वाहनातून प्रवासास मुभा द्या, शेतमाल तसेच इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालू ठेऊन पुरवठा साखळीवर परिणाम होऊ देऊ नका, अशा मागण्या चव्हाण यांनी केल्या आहेत.