अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती बिकट होत आहे. मृत्यूदरही वाढत आहे. नगर जिल्ह्यात कोरोना संक्रमणाची रोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत.
गेल्या तीन दिवसांत प्रशासकीय नोंदीनुसार एकूण ८४ मृत्यू झाले आहेत. वेळेवर ऑक्सिजन बेड उपलब्ध न होऊ शकल्याने तसेच ऐन संकटकाळात औषधांचा काळाबाजार झाल्यामुळे हे संकट ओढवले असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
बुधवारी सायंकाळपर्यंत चोवीस तासांच्या कालावधीत जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत २ हजार ४०५ ने वाढ झाली आहे, सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५ हजार ५१७ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात बुधवारी १ हजार १२० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६ हजार २२१ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण देखील चांगले आहे. बुधवारी सायंकाळ पर्यंत हे प्रमाण आता ८६.२९ टक्के इतके झालेले आहे.