अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- प्रत्येक वर्षी ५ जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जागरुकता मोहीम आहे.
वसुंधरेची चिंता असलेले, त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून आजचा दिवस हा उत्साहाने साजरा केला जातो. आज जगासमोर हवामान बदलाचं संकट उभं आहे. दिवसेंदिवस जागतिक तापमानात वाढ होतेय, प्रदुषणाची समस्या वाढतेय.
अनेक ठिकाणची जंगले विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त केली जातात. केवळ आपल्या फायद्यासाठी पर्यावरणाच्या स्त्रोतांचा अमाप वापर केला जातो, त्याचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर केला जातो.
पृथ्वीवर आणि समुद्रातही प्लॅस्टिकचे साम्राज्य वाढलं आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजिवांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. या संकटांपासून बचाव करण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचं आहे. त्या साठी काही गोष्टींचं पालन करण गरजेच आहे.
तुलनेने शहरात ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. स्वतःला तसंच इतरांना त्रास होऊ नये, यासाठी ओला आणि सुका कचरा ठेवण्याची सवय लावून घ्यावी.
प्लास्टिक स्ट्रॉ ऐवजी पेपर स्ट्रॉ चा वापर करावा. दुधाची पिशवी पूर्णपणे फाडूनच फेकावी. या पिशव्या तुम्ही पूर्ण न फाडल्यास त्याच्या रीसायकल प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात.
नद्यांपासून ते पाण्याचे अन्य प्रमुख स्त्रोत उदाहरणार्थ तलाव, तळे, इत्यादींमध्ये साबण, पॉलिथिन, कचरा, प्लास्टिक किंवा काचेच्या बाटल्या, पूजेचे साहित्य फेकण्याची वाईट सवय वेळीच बंद करा. दात घासताना, चेहरा धुताना पाण्याचे नळ खुले सोडू नका.
शॉवर ऐवजी बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळी करावी. सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे नळ उघडे दिसल्यास बंद करावे. अशा छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर पाण्याचा अपव्यय टाळला जाईल.
यापासून आपले आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी एखाद्या कार्यक्रमामध्ये अन्नपदार्थांसाठी प्लास्टिक ऐवजी स्टीलच्या भांड्याचाच वापर करावा. तुमच्या हा छोटा प्रयत्न पर्यावरण वाचवण्यासाठी खूप मोठे पाऊल ठरू शकतो.
लॅपटॉप/ मोबाइल एकदाच पूर्णतः चार्ज करा. कारण या उपकरणांसाठी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च होते. एलईडी किंवा सीएफएल बल्बचा वापर करावा.