अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- शासनाने वारकऱ्यांना पायी दिंडी परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी जिल्हाध्यक्ष रामकिसन महाराज तापडिया यांच्यासह संत मंडळींनी केली आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संक्रमणामुळे शासनास वेळोवेळी मंदिर, भजन, कीर्तन, कार्यक्रम आदींवर शासकीय बंदी ठेवून त्यास सहकार्य केले असताना आता लॉकडाऊन उघडूनदेखील पायी दिंडीस परवानगी नाकारल्यानेे वारकरी संप्रदायात संताप व्यक्त होत असून, शासनाच्या या निर्णयाचा जाहीर निषेध केला आहे.
यावर्षी कोरोनामुळे शासनाने राज्यातील मानाच्या १० दिंड्यांमधील १०० वारकऱ्यांना पायी दिंडीस परवानगी दिली. यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी, सासवड येथील सोपानकाका दिंडी, मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई दिंडी, पैठण येथील संत एकनाथ महाराज दिंडी, त्रिंबकेश्वर येथील निवृत्ती नाथांची पालखी, निळोबारायाच्या पालखी, या दिंड्यांना परवानगी दिली.
त्याचधर्तीवर राज्यातील सर्व भागांतून जाणाऱ्या पायी दिंडी सोहळ्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी जिल्हाध्यक्ष रामकिसन महाराज तापडिया, कल्याण महाराज काळे, भारुडसम्राट हमीद सय्यद, चंद्रकांत महाराज झिरपे,
मारुती महाराज झिरपे, ज्ञानेश्वर महाराज बटुळे, ज्ञानेश्वर महाराज सबलस, महेश महाराज हरवणे, रमेश महाराज जाधव, माऊली महाराज मोरे, भाऊसाहेब महाराज मानळ, ईश्वर महाराज वाघमारे यांनी केली आहे.