अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- राज्यात अद्यापही कोरोनाचे संकट कायम आहे. यामुळे शासनाने काही निर्बंध घालून दिले आहे. यातच वर्षभर वाट पाहत असणारे पंढरीच्या वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे.
येत्या आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूरसह आजूबाजूच्या 9 गावांमध्ये 17 जुलै ते 25 जुलै दुपारी चार वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
त्याचबरोबर 18 जुलै ते 25 जुलै या कालावधीमध्ये चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. आज पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली.
पंढरपूर एसटी महामंडळाच्या आगारातून सुरू असणारी सर्व प्रकारची वाहतूक सेवा तसेच अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व खाजगी वाहतूक सेवा 17 जुलै ते 25 जुलैपर्यंत बंद करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते 20 जुलै रोजी पहाटे 2:20 ते 3:30 पर्यंत शासकीय महापूजा होणार आहे.
त्यानंतर सर्व मानाच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी 19 जुलै रोजी आगमन होऊन दिनांक 24 जुलै रोजी पंढरपूरहुन प्रयाण करतील. दरम्यान आषाढी वारीसाठी वाखरी येथे मनाच्या दहा पालख्या 19 तारखेला येणार आहेत.
तिथून प्रतिकात्मक पायी वारीसाठी इसबावीपर्यंत 40-40 च्या दहा गटांमध्ये हे वारकरी येणार आहेत. तिथून पुढे प्रत्येक पालखीचे दोन प्रतिनिधी असे एकूण 20 लोक पुढचे साडेचार किलोमीटर पायी चालत येणार आहेत.
तर उर्वरित 380 लोक आपापल्या वाहनांमध्ये आपापल्या मठांकडे प्रस्थान करणार आहेत. यासाठी पोलीस प्रशासनाकडून त्रिस्तरीय नाकाबंदी लावण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका आणि पंढरपूर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 3 हजार पोलिसांचा फौजफाटा यासाठी सज्ज असणार आहे.