अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- वेळीच कोरोना नियमांचे पालन न केल्यास येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट अत्यंत धोकादायक ठरु शकते, असा इशारा कोरोनावर देखरेख ठेवणाऱ्या वैज्ञानिकांनी दिला आहे.
जर कोविड नियमांचे पालन केले नाही तर कोरोना विषाणुच्या तिसऱ्या लाटेचे ऑक्टोबर -नोव्हेंबरपर्यंत पीक येण्याची शक्यता आहे, असा इशारा कोरोना साथरोगाशी संबंधित एका सरकारी समितीच्या वैज्ञानिकाने दिला आहे.
दु सऱ्या लाटेवेळी वाढलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत त्यावेळी रुग्णसंख्या अर्ध्यावर असू शकते, असाही अंदाज वर्तविला.जर कोरोनाच्या व्हेरिएंटमध्ये कोणता बदल झाल्यास ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान कोरोना पुन्हा एकदा डोकंवर काढेल.
दरम्यान, विषाणूचा नवा व्हेरिएंट आला तर मात्र तिसरी लाट वेगाने पसरण्याची शक्यता समितीचे सदस्य मनिंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केली.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात गेल्या वर्षी गणितीय सूत्रांचा वापर करून कोरोना विषाणूच्या संक्रमणात होणाऱ्या वाढीचा अंदाज घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीत अग्रवाल यांचा समावेश आहे.
या समितीत आयआयटी हैदराबादचे वैज्ञानिक एम. विद्यासागर आणि एकीकृत संरक्षण विभागाचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांचाही समावेश आहे. या समितीला दुसऱ्या लाटेचा अंदाज न आल्यामुळे टीकेचा सामनही करावा लागला होता.
देशात तिसरी लाट पसरल्यास दैनंदिन रुग्णसंख्या 1,50,000 ते 2,00,000 पर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे अग्रवाल म्हणाले. ही आकडेवारी मे महिन्याच्या पूर्वार्धात आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत अर्धी असेल.
दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत भरीव वाढ झाली होती आणि हजारोंचा मृत्यू झाला होता. दरम्यान, जसजसा लसीकरण मोहिमेला वेग येईल तसतसे तिसऱ्या लाटेची शक्यता कमी होईल, असेही ते म्हणाले. लसीकरणामुळे रुग्णालयात भरती होण्याच्या संख्येचे प्रमाणही कमी असेल असा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे.