अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाभरातील कोरोनाबाधितांना विविध माहितीसह औषधोपचार मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वॉररुमचे उद्घाटन नुकतेच संगमनेरात झाले.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या संगमनेरातील मध्यवर्ती संपर्क कार्यालयात हे वॉररुम सुरु करण्यात आले आहे. याचा फायदा कोरोनाबाधितांसह रुग्णांच्या नातेवाईकांना होणार असल्याची माहिती आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.
यावेळी बोलताना तांबे म्हणाले, राज्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील व चालू वर्षात कॉंग्रेस पक्ष व कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने जनतेला मदत करीत आहेत.
स्वतः मंत्री थोरात यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा सातत्याने आढावा घेतला. जिल्ह्यात रूग्णांसाठी ऑक्सिजन व्यवस्था, औषधे व बेडच्या उपलब्धतेसाठी सक्रीय पुढाकार घेतला आहे.
या वॉररुममधील मदत केंद्रातून विविध तालुक्यातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना साधे, ऑक्सीजनयुक्त व व्हेंटिलेटर बेड उपलब्धता, रुग्णवाहिका, प्लाझ्मा व औषधे सुविधांसाठी तत्परतेने मदत केली जाणार आहे.