पाणी प्रश्न मिटणार…भंडारदरा, निळवंडेनंतर मुळा धरणही भरले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा, निळवंडे पाठोपाठ आता जिल्ह्यातील सर्वात मोठे मुळा धरणही काल मंगळवारी दुपारी ओव्हरफ्लो झाल्याने नगरकरांची रब्बी हंगामासाठी पाण्याची चिंता मिटली आहे.

मंगळवारी सायंकाळी धरणाचा पाणीसाठा 24 हजार 444 दशलक्ष घनफूट (94 टक्के) झाल्याने धरण तांत्रिकदृष्टय़ा भरल्याचे जाहीर करण्यात आले. तर, कोतूळकडून आठ हजार 376 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. भंडारदरा धरण नेहमीप्रमाणे 15 ऑगस्टपर्यंत भरते.

पण तसे घडले नाही. भंडारदरा भरले नसल्याने निळवंडेही रिकामे राहिले. मुळा धरणातही फारशी आवक झाली नाही. 1 सप्टेंबर रोजी भंडारदरा 84.86 टक्के, निळवंडे 76 टक्के, मुळा 73 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे ही धरणं ओव्हरफ्लो होतील की नाही याबाबत शंका घेतली जात होती.

पण पाणलोटात मुसळधार पाऊस दाखल झाला आणि धरणे देखील भरली गेली. मागील पाच दिवसांपासून भंडारदरा व निळवंडे पाणलोट क्षेत्रात धो-धो पाऊस कोसळत असल्यामुळे रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले.

त्यानंतर निळवंडेही ओव्हरफ्लो झाले. रात्री 20611 क्युसेकनेे पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदीला या हंगामात पहिल्यांदा पूर आला. दरम्यान मुळा नदीपात्रात 1075 क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

कोतूळकडून पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे. नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office