पाणी प्रश्न मिटणार…सीना नदी खोलीकरणाचे काम प्रगतिपथावर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवीमधील नदीपात्र खोलीकरणचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे.

येथील ग्रामस्थांनी मागील वर्षीपासून सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी लोकवर्गणीतून व दानशूर व्यक्तींच्या मदतीतून सीना नदी खोलीकरण कामास सुरुवात केली आहे. पिंपळगाव माळवी परिसर पूर्वीपासून फळे व भाजीपाला पिकविणारा भाग म्हणून प्रसिद्ध आहे.

येथील तलावामुळे परिसर शेतीला पाणी उपलब्ध आहे; परंतु तलाव कोरडा पडल्यानंतर शेतकऱ्यांची अवस्था बिकट होते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा निश्चय केला आहे. गावातील युवक वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग दिल्यामुळे नदी खोलीकरणाचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे.

तसेच सीना नदी खोलीकरण कामासाठी अवतार मेहेरबाबा ट्रस्ट, मेहेराझाद यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली आहे.

यामुळे या कामास मोठा आर्थिक हातभार लाभल्याने हे खोलीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. या उपक्रमामुळे आता या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी अडविण्यास मदत होणार असून,

परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होण्यात मदत होणार आहे, तसेच या नदीकाठी राहणाऱ्या दोनशे कुटुंबांच्या रस्त्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे.

नदीपात्राच्या दोन्ही बाजूंनी रस्ते तयार करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना दूध व शेतमाल बाजारपेठेत नेण्यास येणारी समस्या दूर झाली आहे. या नदी खोलीकरणामुळे परिसरातील शेकडो एकर शेतजमिनीस फायदा होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24