अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेवरील विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असून, पाणी योजनेवरील विद्युतपुरवठा सुरळीत करा, असा आदेश आमदार संग्राम जगताप यांनी महावितरणला दिला.
नगर शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्नांची अडचण पाहता आमदार जगताप यांनी तातडीने महावितरण व महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वरील आदेश दिला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पाणी उपसा केंद्रावरील विद्युतपुरवठा वारंवार खंडित झाला.
त्याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला.यामुळे पाणी उपसा केंद्रावरील विद्युतपुरवठा अखंडित सुरू ठेवणे गरजेचे आहे. मुळा धरण व विळद घाट येथील पाणी उपसा केंद्र परिसरात एक्स्प्रेस फिडर प्रस्तावित आहे. त्यासाठी महापालिकेने महावितरणकडे २ कोटी ४० लाख रुपये जमा केलेले आहेत.
परंतु, हे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे पाणी उपसा केंद्र परिसरातील विद्युतपुरवठा वारंवार खंडित असून, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. विद्युतपुरवठा खंडित झाल्याने मुळानगर, विळद, नागापूर येथून होणारा पाणी उपसा बंद पडतो.
परिणामी पाण्याच्या टाक्या वेळेवर भरत नसल्याने सर्वच भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे यावेळी महापालिकेकडून सांगण्यात आले