अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- घोटी इगतपुरी कार्यक्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचे पाणी दारणा, गंगापूर धरण समूहात जमा झाले असून ते गोदावरी नदीला सोडले जात आहे.
मात्र कोपरगाव परिसरात पर्जन्यमान अजूनही झाले नाही. त्यामुळे येथील खरीप पिके पाण्यावर आली आहेत. पाटबंधारे खात्याने तत्काळ गोदावरी कालव्यांना शेती पाण्याचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी नाशिक पाटबंधारे विभागाकडे केली.
शेतीला पाण्याची गरज असताना गोदावरी नदीला पाणी सोडले जात आहे. यामुळे महाविकास आघाडीचे अजब तुझे सरकार असेच म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. सध्या गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यावरील हजारो हेक्टर खरीप पिके पाण्याअभावी जळू लागली.
शेतकरी पाण्याची मागणी सातत्याने करत आहे. मात्र महाविकास आघाडीचे सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्याऐवजी त्यांनी ते नदीला सोडले.
त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने नदीपात्रात पाणी सोडून देण्याऐवजी कालव्याना पाणी सोडण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही साहेबराव रोहोम यांनी दिला आहे.