अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची कोरोनावर मात करण्याची संख्या मोठी असली तरी अद्यापही कोरोना पूर्णपणे संपला नाही. नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.
जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. जयंत पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही.
डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो.
जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद” असे ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.
सध्या लॉकडाउनच्या नियमात शिथिलता करण्यात आली असून, जवळपास सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. परंतु नागरिक मास्कचा वापर करत नाहीत,
त्यामुळे मागील दोन तीन दिवसापासून राज्यभरात कोरोनाग्रस्त रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.