अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- अहमदनगर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन मनमाड हायवे लगत नांदगाव येथे जेसीबीच्या फटक्याने फुटली. त्यामुळे नगर शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.
आज पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला उद्या तर उद्या पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला परवा पाणी मिळणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.अमृत योजनेअंतर्गत अहमदनगर शहरासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम जेसीबीने सुरु आहे.
हे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून सातशे व्यासाची पाईपलाईन फटक्यात फुटली. त्यामुळे तातडीने शहराचा पाणीपुरवठा बंद करावा लागला. अमृत योजनेचा ठेकेदार आणि महापालिकेने तातडीने फुटलेली पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
मात्र त्यास अवधी लागणार आहे, त्यामुळे काल मंगळवारी पाणीपुरवठा होणाऱ्या नागापूर, बोल्हेगाव, पाईपलाईन रोड, बुरुडगाव रोड, सारसनगर, मुकुंदनगर, केडगाव आणि कल्याण रोडवरील शिवाजीनगर भागाला पाणीपुरवठा झाला नाही.
आता या भागाला आज बुधवारी पाणी वाटप केले जाणार आहे. बुधवारी पाणीवाटप असणाऱ्या मंगल गेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, कलेक्टर ऑफिस परिसर, डाळ मंडई, सर्जेपुरा, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा या भागाला आज उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.