अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- आरक्षणाबाबतीत केंद्र सरकारवर दोषारोप करणारे महाविकास आघाडीचे नेते भूमिकेपासून पळ काढत आहेत. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात रद्द होण्यास त्यांचा निष्क्रिय कारभारच कारणीभूत ठरला.
समाजाच्या न्याय हक्काच्या लढाईत आम्ही सक्रीय आहोत, अशी ग्वाही भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी दिली. आमदार विखे यांनी संगमनेरातील सकल मराठा समाज संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेत आरक्षणाच्या मुद्यावर भूमिका स्पष्ट केली.
आमदार विखे म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात भाजपा युतीने सकारात्मक भूमिका घेत उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले, परंतु आघाडी सरकारच्या सत्तेत आरक्षण रद्द झाले. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही.
आरक्षणाचा प्रश्न राजकीय नाही, तर तो मराठा समाजाचा स्वाभिमान आणि अस्मितेचा आहे. राजकारणापलिकडे जाऊन पुढची लढाई करावी लागेल, असे ते म्हणाले.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटक नितीन दिनकर, सरचिटणीस सुनील वाणी, जालिंदर वाकचौरे, ॲड. बापूसाहेब गुळवे, तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, डॉ. सोमनाथ कानवडे, नगरसेविका मेघा भगत,
अमोल खताळ, नीलिमा घाडगे, अक्षय थोरात, सुधाकर गुंजाळ, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीराज डेरे, व्यापारी आघाडीचे शिरीष मुळे, किसान आघाडीचे सतीश कानवडे यावेळी उपस्थित होते.