अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. या लाटेमध्ये तज्ञांच्या सुचनेनुसार लहान मुलांवर परिणाम होणार आहे.
तरी प्रत्येकाने मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढे यावे, एकजुटीने मुकाबला करून कोरोनाची लढाई आत्मविश्वासाने जिंकायची आहे, असे प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले.
गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद कॉलेज येथे जय आनंद फाउंडेशनच्या सहयोगातून व मनपा संचलीत ऑक्सिजन सुविधा असलेले नवीन आयसीयू विभागाचा शुभारंभ उद्योजक फिरोदिया यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे,
उद्योजक नरेंद्र बाफना, उद्योजक राजेश कटारिया, नगरसेवक विपुल शेटीया, कमलेश भंडारी, रितेश पारख, डॉ. पियूष मराठे, उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, सीए किरण भंडारी, संदेश कटारिया, अशोक गुगळे आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, उद्योजक नरेंद्र फिरोदिया हे गेली एक वर्ष सामाजिक बांधिलकी जोपासत बूथ हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णांना मोफत जेवण देण्याचे काम करत आहेत. तसेच प्लाझ्मा निर्मिती मशिन रक्तपेढीला भेट दिली. तज्ञांच्या इशाऱ्यानुसार कोरोनाची तिसरी लाट येणार आहे.
या लाटेला थांबवण्यासाठी पूर्व तयारी करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर आयुर्वेद महाविद्यालय येथे जय आनंद फाउंडेशनच्या विशेष सहयोगातून व मनपा संचलित ऑक्सिजन सुविधा असलेले नविन आयसीयू विभागाचा शुभारंभ केला आहे. लवकरच या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट सुरू होणार आहे.
आपण केलेल्या कामाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे. गेल्या १ वर्षांपासून मानवी जीवनावर कोरोनाचे महाभयंकर संकट आले आहे.
वर्षभरापासून शहरातील डॉक्टर्स, आरोग्य सेवक, मनपाची आरोग्य यंत्रणा, कोविड सेंटर चालवणाऱ्या खासगी व्यक्ती, संस्था यांनी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्रयत्नाची परकाष्ठा केली अनेकांचे प्राण वाचवले.
काही दुर्देवी घटना सोडता नगर शहरातील नागरिकांनी कोरोनाला आत्मविश्वासाने पराभूत केले. अजुनही नगरकर शासनाने निर्बंध पाळत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे.