बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार – महसूलमंत्री

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-जिल्हा सहाकारी बँकेत चार जागांसाठी काल मतदान झाले. त्याची मतमोजणी आज झाली. मतदारांनी महाविकास आघाडी आणि भाजपला समान संधी दिली.

दोन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जागा मिळवल्या. यापूर्वी सतरा जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात आजीमाजी आमदार-खासदार मंत्र्यांचा समावेश आहे. बँकेतील ही लढाई भाजप विरूद्ध महाविकास आघाडी झाली.

त्यातही विखे विरूद्ध थोरात असाच हा सामना झाला. यात विखे गटाला यापूर्वी दोन जागा बिनविरोधमध्ये मिळाल्या आहेत. एकंदर बँकेत महाविकास आघाडीने भाजपला चारीमुंड्या चीत केले आहे.

जिल्हा सहकारी बँकेच्या निकालानंतर रविवारी दि.२१) महसूलमंत्री थोरात यांनी संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधला. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली.

चार जगांकरिता झालेल्या निवडणुकीत एका जागेकरिता अपेक्षित निकाल आला नाही, हे दुर्दैवाने घडले. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय आम्ही एकत्रित बसून करणार आहोत, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही महाराष्ट्रातील आदर्श बँक आहे. या बँकेच्या माध्यमातून साखर कारखान्यांना कर्जाच्या रुपाने मदत होत असते. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज देण्याचा अभिनव उपक्रम या बँकेने केला आहे.

ही महत्त्वाची बँक असून या बँकेची निवडणूक राजकारण विरहित केलेली आहे. साखर कारखानदारी सगळ्यांकडे आहे. ती चांगल्या पद्धतीने चालली तर आर्थिक चलन चांगले फिरते.

जिल्ह्यात साखर कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालवण्याची पध्दत आहे. ही शिस्त आमच्याकडे असून ती आम्हाला टिकवायची आहे. त्यात राजकारण असा गुंता आम्ही करत नाही, असेही थोरात म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24